पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेलचे काम वादग्रस्त ठेकेदाराला दिले आहे. हे काम गोंडवाना कंपनीला देऊ नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आवाज उठविला. मात्र, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून त्यांच्या दबावाखालीच जॅकवेलचे काम गोंडवाना कंपनीला दिले आहे. त्यामुळे आयुक्त नसून भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे महापालिकेत कामकाज करत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सोमवार (दि.3) केली. तसेच जॅकवेल निविदेच्या मंजुरीविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही गव्हाणे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडचा भामा आसखेड धरणातील मंजूर कोटा उचलण्यासाठी धरण क्षेत्रात अशुध्द जलउपसा केंद्र बांधण्यासाठी गोंडवाना इंजि. कंपनीच्या निविदेला आयुक्तांनी 29 मार्चला मंजुरी दिली. राजकीय आरोप आणि महत्वाची माहिती दडवल्याचा कंपनीवर आरोप आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देत आयुक्तांनी 176 कोटी खर्चाचे काम करण्यास गोंडवाना कंपनीला अनुमती दिली आहे. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी महापालिकेतील आयुक्त कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, कार्याध्यक्ष फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, प्रवक्ते विनायक रणसुभे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, माजी नगरसेवक अतुल शितोळे, राजेंद्र साळुंखे, राजू बनसोडे, संगीता नानी ताम्हाने, माया बारणे, विक्रांत लांडे, संजय वाबळे, चंद्रकांत वाळके, दीपक साकोरे,संदिपान झोंबाडे सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदीप तापकीर, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, महिला निरीक्षक शितल हगवणे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महीला उपाध्यक्ष पुनम वाघ, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, महिला कार्याध्यक्ष सविता धुमाळ, मेगा पळशीकर, चिंचवड विधानसभा महिला संघटक मीरा कदम, बचत गट अध्यक्षा शीला भोंडवे, युवक चिंचवड विधानसभा अध्यक्ष उमेश काटे, प्रवीण पिंजन, राहुल पवार, ओम क्षीरसागर, प्रतिभा दोरकर, विक्रम पवार, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, अश्विनी तापकीर आदी उपस्थित होते.
अजित गव्हाणे पुढे म्हणाले, गोंडवाना इंजि. कंपनीने भामा आसखेड जॅकवेल कामाची निविदा भरताना अत्यंत महत्वाची माहिती लपविली होती. प्रामुख्याने मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री पेयजल योजनेत या कंपनीला काम दिले होते. पण, निकष्ट काम केले म्हणून त्यांची मान्यता रद्द करण्यात आली होती. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर महापालिकेत वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून या कंपनीचे काम काढून घेतले आणि सुरक्षाठेव जप्त केली होती. त्याबाबत छत्तीसगड उच्च न्यायालयात दाखल केलेली माहितीही कंपनीने लपविली. असे असताना आयुक्तांनी जॅकवेलचे काम गोंडवाना कंपनीला दिले आहे. त्यामुळे आयुक्त सिंह हे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. ते आयुक्त नसून भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. जॅकवेल निविदेच्या मंजुरीविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही गव्हाणे यांनी सांगितले.