पिंपरी । प्रतिनिधी :- आदर्श कसा असावा? तो म्हणजे प्रभू श्रीराम आहेत. राजकारण धुरंधर कृती म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अवतारी पुरषांनी हातात भगवा घेतला होता. सर्वोदय आणि सूर्यात्साला अवकाश भगवेमय होते. हातात भगवा घेण्यासाठी स्वत:ची आहुती देण्याची तयारी असावी लागते. त्याच्याच डोक्यावर भगवी टोपी, फेटा शोभून दिसतो. परमोच्च त्याग, समर्पण भावना म्हणजे भगवा रंग आहे. कधी राम व्हायचे? आणि कधी कृष्ण व्हायचे? हे जाणले ते छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्यांना जी भाषा समजते. त्याच भाषेत समजवले पाहिजे. या विचारांतूनच छत्रपतींनी स्वराज्य घडवले, असे मत हिंदुत्ववादी विचारवंत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यात्मिक गुरू स्वामी स्वरुपानंद महाराज, प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत शरद पोंक्षे, हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई, माजी महापौर राहुल जाधव, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, संतोष बारणे, नितीन बोराटे, सचिन तापकीर यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पोंक्षे म्हणाले की, केवळ श्रीराम नवमीला रामाचा आठवण काढायची आणि इतर दिवशी विसरायचे, ही आपली संस्कृती आहे. ‘डे’ म्हणजे फादर डे, मदर डे साजरा करण्याची संस्कृती परकीयांची आहे. आपला प्रत्येक दिवस श्रीरामामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेला आहे. आपण हिंदू म्हणून जगतो आहोत. ताट मानेने उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच हे सौभाग्य मिळाले आहे. राजमाता जिजाऊंनी केवळ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केले.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्यातील अनेक नेत्यांनी काही वर्षांपूर्वी क्रांतिवीर सावरकर यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाबाबत तोंड भरुन स्तुती केली. तेच राजकीय मंडळी आज सावरकरांच्या विचारांना विरोध करीत आहेत. राजकीय लोकांनी सोयीनुसार समाज वाटून घेतले आहेत. सोईनुसार देव आणि अस्मिता वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे राजकीय लोकांनी व्यासपीठावर बोलताना इतिहासाचे दाखले देवू नयेत, अशी माझी भूमिका आहे. प्रत्येक कुटुंबासाठी प्रभू श्रीराम आदर्श आहेत. प्रेरणास्थान आहेत.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात हिंदू राष्ट्र होईल…
यावेळी पोंक्षे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडावरील अफझल खान भेटीचा प्रसंग सांगीतला. तसेच ‘‘अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च’’याचाही अर्थ समाजवून सांगितला. अफझल खान भेटीत छत्रपतींनी अहिंसा किंवा गांधीवादी भूमिका घेतली असती, तर काय झाले असते? असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. निधर्मी राष्ट्राच्या (सेक्युलर) संकल्पनेवरही त्यांनी सडकून टीका केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू राष्ट्र घोषीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निलेश बोराटे यांच्या कार्याला कौतुकाची थाप…
समाजाचे प्रबोधन करण्यासाठी निलेश बोराटे यांनी प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. या माध्यमातून केवळ लोकांची मते मिळवण्यासाठी किंवा नगरसेवक होण्यासाठी आपण कार्यक्रम घेत नाही, तर लोकांना आणि समाजाला दिशा देण्यासाठी कार्यक्रम घेतो… असा संदेश निलेश बोराटे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला आहे. बोराटे कुटुंबीयांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे, अशा शब्दांत आमदार महेश लांडगे यांनी युवा नेते निलेश बोराटे यांचे कौतूक केले.