पिंपरी, (प्रतिनिधी) :- साफसफाई काम करणाऱ्या महिलेने पगाराचे पैसे मागितल्याने एकाने जातिवाचक शिवीगाळ करत तिच्या नाका-तोंडावर बुक्क्याने मारून बेदम मारहाण केली. ही घटना निगडी भेळ चौक येथील सिटी प्राईड बिल्डिंगमध्ये घडली.
हर्षद कमाल खान (वय २५, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसा (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा भाऊ अमजद याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून पीडित महिला तेथे साफसफाईचे काम करायची. या महिलेचा पगार थकला होता. महिलेने पगाराचे पैसे मागितले असता हर्षद व महिला यांच्यात बाचाबाची झाली. यातून हर्षदने महिलेच्या तोंडावर, नाकावर बुक्क्या मारत बेदम मारहाण केली. तसेच, महिलेचा विनयभंग करत जातिवाचक शिवीगाळ केली. फौजदार गायकवाड तपास करीत आहेत.
योग्य ते सकारात्मक पोलिसांकडून कार्यवाही करणे करता एडवोकेट सागर रतन चरण मा. सदस्य जिल्हा दक्षता समिती यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांना पत्र व्यवहार केला व त्याची तात्काळ दखल घेत आयोगाने नोटीस बजवलेलं आहे.
त्यामध्ये गुन्हा सुमारे सकाळी साडेदहा वाजता घडला मात्र अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला रात्रीचे साडेनऊ वाजले. पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास एवढा वेळ का लागला असा प्रश्न विचारला आहे. याची योग्य चौकशी झाली पाहिजे. पीडित महिलेस तीन महिन्यांचा थकलेला पगार देण्यात यावा, त्यांच्या उपचारासाठी खर्च मिळावा, अशी मागणी ॲड. सागर चरण यांनी या पत्रात केली. याची तत्काल दखल घेत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने, जिल्हाधिकारी पुणे समाज कल्याण आणि पोलिसांना नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिसांना वेळेत गुन्हा का नोंदवून घेतला नाही याची कारणे विचारली आहेत. त्याच बरोबर भारतीय संविधानातील अनुच्छेद ३३८ नुसार तपास करण्यास सांगितले आहे. पीडित महिलेला तीन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे आणि त्यांचे काम सुरू ठेवण्यासाठी मदत करावी. पी.सी.आर कायदा व अट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार भरपाई द्यावी. ही नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत यावरील कारवाईची माहिती आयोगाला द्यावी, असेही आयोगाने बजावले आहे.