पिंपरी, दि. ३० – पिंपरी-चिंचवडमधील मोरया सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आयोजित जागतिक पाणी परिषदेत विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांनी युनाइटेड नेशन्शमध्ये वॉटर हेल्थ ऍम्बेसेडर हा प्रकल्प सादर करून पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक स्तरावर नेले.
युनाइटेड नेशन्शने न्यूयॉर्क शहरात २१ ते २४ मार्च या दरम्यान जागतिक पाणी परिषदेच आयोजन केले होते. ही पाणी परिषद युनाइटेड नेशनच्या मुख्य कार्यालयात पार पडली. या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधील मोरया जागतिक प्रतिष्ठान या संस्थेला विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. या पाणी परिषदेसाठी युनाइटेड नेशनने स्वयंसेवी संस्थांना सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्प सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते.
या मुदतीत चिंचवडमधील मोरया सामाजिक प्रतिष्ठानने वॉटर हेल्थ ऍम्बेसेडर हा ट्रेनिंग देणारा प्रकल्प सादर केला होता. या परिषदेसाठी जागतिक स्तरावरील ११०० पेक्षा जास्त संस्थानी वेगवेगळे प्रकल्प सादर केले होते. त्यातील ३४० प्रकल्पांना यूनाइटेड नेशन्सने मान्यता दिली. तसेच या परिषदेसाठी मोरया सामाजिक प्रतिष्ठानला विशेष मान्यताप्राप्त संस्था म्हणून निमंत्रित केले होते.
त्यानुसार प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके हे परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यांनी २३ मार्च रोजी युनाइटेड नेशनमध्ये प्रतिष्ठानच्या प्रकल्पाचे सादरीकरण करून पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक स्तरावर नेले. युनाइटेड नेशन्समध्ये या प्रकल्पाचे कौतुक करण्यात आले. तसेच हा प्रकल्प युनाइटेड नेशनच्या धोरणाप्रमाणे सर्व मान्यता मिळाल्यानंतर जगात सर्वत्र राबवण्यात येणार आहे.
मोरया सामाजिक प्रतिष्ठानला विशेष मान्यताप्राप्त संस्था म्हणून पुढील तीन वर्षांसाठी मान्यता मिळालेली आहे. प्रतिष्ठानने तयार केलेल्या प्रकल्पासाठी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, युनाइटेड नेशन्स आउटर स्पेस ऑस्ट्रियाचे संशोधक शिरीष रावण, संतोष चव्हाण, डॉ. सरोज अंबिके, आरती विभुते, नितीन साळी, महेश डोंगरे, राजेश डोंगरे, प्रितम किर्वे यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉ. गणेश अंबिके यांनी सांगितले.