भाजप विजयाचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होईल?

0
305

विशेष लेखपिंपरी चिंचवड दि.३ (सुरज साळवे) :- स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे नुकतीच चिंचवड विधानसभा पोटनिवडुक २०२३ पार पडली. या मध्ये मोठ्या मताधिक्याने त्यांच्या पत्नी अश्विनी ताई जगताप निवडून आल्या आहेत.आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने पूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची निवड केल्यामुळे याचा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला आहे.३६०९१ मताच्या फरकाने अश्विनी ताई जिंकल्यामुळे या निवडणुकीचे “किंगमकर” म्हणून शंकर जगताप यांच्याकडे पहिल्या जात आहे. आता महापालिकेची निवडणुक कधी लागेल याकडे राजकीय मंडळीच लक्ष लागले आहे. शंकर जगताप यांनी भावाच्या मागेही चिंचवडचा गड राखला.तसाच गड महानगरपालिकेच्या वेळेस राखला जाईल का? हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.

१० दिवसात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक लागून एक वर्ष पूर्ण होईल. १३ मार्च २०२२ रोजी महानगरपालिकेची मुदत संपुष्टात आली होती त्यामुळे पालिकवर प्रशासक लागू झाले होते. या दरम्यान पालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे अशी कुजबूज नागरिकात होत असून निवडणुका लवकर घ्याव्यात अशीही चर्चा होत आहे. शहरात अनेक कामे धूळखात पडली आहेत. त्यामध्ये रस्त्याची कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. पायलट प्रोजेक्ट अजूनही पूर्ण झाला नसल्याने काही भागात पाण्याची समस्या भेडसावते आहे. पालिकेवर प्रशासका ऐवजी राजकीय सत्ता असल्यास कामांना गती मिळते. अनेक कामात तरतुदीनुसार स्थायी समिती तसेच जनरल बॉडीची मान्यता घेणे आवश्यक असते. त्यामुळे निवडणुका होणे गरजेच आहे.

पालिकेवर अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. त्यांच्या काळात शहराने विकासाच्या दृष्टीने झेप घेतली. मजबूत रस्ते, विदेशी कंपन्या या ठिकाणी आल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. निवडणुकीत याच मुद्द्यावर राष्ट्रवादीने निवडणूक लढवल्यास भारतीय जनता पार्टीला जड जाऊ शकते. महविकास आघाडी विरुद्ध भाजपा निवडणूक झाल्यासही अजून जास्त जड जाऊ शकते. भाजपच्या सत्ता काळात स्थायी समितीच्या सभापतीवर एसीबीची झालेली कारवाई जनता विसरू शकत नाही. अशा अनेक कारणांनी बीजेपीचा सत्ता काळ गाजला. जी चूक राष्ट्रवादीने केली तीच चूक बीजेपी ने केली असल्यामुळे सध्या जनता संभ्रमात आहे. शेवटी जनता जनार्दन असते येणाऱ्या निवडणुकीत तीच निर्णय घेईल.

महापालिकेवर सत्ता कोणाची असेल हे भोसरी व चिंचवड मतदार संघ ठरवतो. भाजपच्या करणाम्यामुळे भोसरीतील नागरीक नाराज आहेत. या उलट चिंचवड मध्ये स्व. लक्ष्मण भाऊच्या विकास कामावर नागरीक खूष आहेत. कारण कालच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे शंकर जगताप यांच्यावर विश्वास ठेऊन स्थानिक नागरीक चिंचवड भागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देतील यात शंका वाटत नाही. भाजपची सत्ता येणे हे भोसरिकरच ठरवतील असा आशावाद वाटू लागला आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीवर पोटनिवडणुकीचा परिणाम होईल यात तिळमात्र शंका उरत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here