पिंपरी, दि. २१ – डॉक्टरांकडून मिळवलेल्या खोट्या फिटनेस सर्टीफीकेटच्या आधारे आईचे बोगस मृत्यूपत्र तयार करुन त्याची चिंचवडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद केली. त्याआधारे आईच्या मृत्यूनंतर घरातील इतर वारसदारांच्या हिश्श्यातील मिळकत आणि सदनिका बळकावून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर तक्रारदाराने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर चिंचवड पोलिसांनी अखेर हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करून न घेणाऱ्या चिंचवड पोलिसांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
याप्रकरणी नरेंद्र सुभाष भोईर (वय ४२, रा. प्लॉट क्र.३, भोईरनगर, चिंचवड) यांनी काही दिवसांपूर्वीच चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. मात्र राजकीय दबावापोटी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई चिंचवड पोलिसांनी केली नव्हती. यामुळे फिर्यादी नरेंद्र यांनी मोरवाडी न्यायालयात दाद मागीतली. त्यावर मंगळवारी (दि. २०) सुनावणी झाली. न्यायालयाने चिंचवड पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढत फिर्यादी नरेंद्र यांचे चुलते भाऊसाहेब सोपानराव भोईर, आत्या अरुणा महेंद्र आगळे, भाऊसाहेब यांचे व्यावसायिक मित्र नितीन कन्हैयालाल भन्साळी, बनावट फिटनेस सर्टिफिकेट देणारे एमबीबीएस डॉ. रंजीनसिंह माने आणि बांधकाम व्यवसायिक बाबू म्हेत्रे या पाच जणांवर कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, आयपीसी १२० बी आणि १५६ (३) अनुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश चिंचवड पोलिसांना दिले.
यातील भाऊसाहेब भोईर हे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आहेत. तसेच ते तक्रारदार नरेंद्र भोईर यांचे चुलते आहेत. २००५ रोजी नरेंद्र यांचे आजोबा सोपानराव भोईर म्हणजेच भाऊसाहेब यांच्या वडिलांचे निधन झाले. निधनापूर्वी सोपानराव यांनी बांधकाम व्यवसायिक बाबु म्हेत्रे यांच्यामध्ये एक समजुतीचा करार झाला होता. ज्यामध्ये चिंचवड येथे बांधलेले रेणुका अविष्कार प्रेमलोक पार्क या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील ८०० चौरस फुटाचा सदनिका म्हेत्रे यांनी सोपानराव यांना देण्याचे कबुल केले होते. परंतु १० जानेवारी २०२२ रोजी कुठलीही कल्पना न देता भाऊसाहेब भोईर आणि बांधकाम व्यावसायिक म्हेत्रे यांनी संगनमत करुन ती सदनिका वारसदारांना कल्पना न देता तिचे डीड ऑफ असाइनमेंट तयार करुन भाऊसाहेब भोईर यांनी स्वतःच्या नावे केली.
त्यानंतर फिर्यादी नरेंद्र यांची आजी इंदुबाई सोपानराव भोईर यांचे १३ जुलै २०२१ रोजी निधन झाले. यानंतर देखील भाऊसाहेब यांनी चिंचवड येथील तलाठी कार्यालयात १ डिसेंबर २०२१ रोजी वाटपपत्रानुसार वाटप झालेल्या मिळकत आणि सदनिका बोगस मृत्यूपत्राप्रमाणे वाटण्या न करता स्वत:च्याच नावे करून घेतल्या. तसेच संपूर्ण मिळकतीवर स्वतःचेच नाव लावले. ही बाब २२ ऑगस्ट रोजी नरेंद्र यांना समजली. त्यांनी मृत्यूपत्र तपासले असता डॉ. सिंह यांनी आजी इंदुबाई यांना १८ ऑक्टोबर २००५ रोजी तपासले असल्याचा उल्लेख आहे. तर मृत्यूपत्राचा दस्त हा २३ डिसेंबर २००५ रोजीच झाल्याचे नमूद आहे. जे नियमांना धरुन नाही.
यावर नरेंद्र यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. मात्र राजकीय दबावापोटी भाऊसाहेब भोईर यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई चिंचवड पोलिसांनी केली नाही. यामुळे नरेंद्र यांनी थेट मोरवाडी न्यायालयात धाव घेतली. याबाबत न्यायालयात मंगळवारी (दि. २०) सुनावणी झाली. न्यायालयाने चिंचवड पोलिसांवर ताशेरे ओढत कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा हे देखील नमूद करत गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
Home गुन्हेगारी न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर...